राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या १८ नोव्हेंबर रोजी त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली जाणार असून, सविस्तर कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे.
अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीमधील मंडळ कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. त्यांची छाननी ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजता करण्यात येईल. वैध ठरलेले नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी ७ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रत्यक्ष मतदान १८ डिसेंबरला सकाळी ७: ३० वाजतापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत, तर मतमोजणी मंगळवार, दि. २० डिसेंबर रोजी होणार आहे. अहेरी तालुक्यात सार्वत्रिक निवडणूक होणार असलेल्या ३ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले.

