Mul Borchandli:- मुल-चामोर्शी मार्गावरील बोरचांदली पुलावर ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये रविवारी (१ जानेवारी) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात देवदर्शनाकरिता निघालेल्या दुचाकीस्वार पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. तसेच ट्रॅक्टर पुलाखाली कोसळल्याने चालक जखमी झाला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी ही घटना घडल्याने मूल येथे हळहळ व्यक्त होत आहे. गणपत आगडे असे मृत पतीचे तर सुरेखा आगडे असे जखमी पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत आगडे (Ganpat Agade) हे मुलमधील तेली मोहल्ला येथील रहिवासी होते. रविवारी नवीन वर्षातील पहिल्या दिवसानिमित्त आगडे दाम्पत्य महाकाली मंदिरात देवदर्शनाकरीता निघाले होते. चामोर्शी मार्गाने निघालेले हे दाम्पत्य बोरचांदली पुलावर पोहचले. दरम्यान त्यांनी घरचे पुजेचे साहित्य विसर्जन करण्याकरीता बोरचांदली पुलावर दुचाकी बाजूला थांबवली. हे साहित्य विसर्जन करीत असताना मागून भरधाव येणाऱ्या ट्रक्टरने आगडे दाम्पत्याला जबर धडक दिली. यामध्ये पती गणपत आगडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नी सुरेखा ही गंभीर जखमी झाली. भरधाव वेगात चालवित असलेला ट्रक्टर चालक किशोर गुणाजी पोरटे (रा. मुरखळा ता.चामोर्शी) हे पुलावरुन कोसळल्याने जखमी झाले.
घटनेची माहिती मूल पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन जखमी पत्नी सुरेखा व ट्रक्टर चालका यांना मूल येथील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. नवीन वर्षात झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे मूल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

