Swami Vivekanand Jayanti Vishesh : आज राष्ट्रीय युवा दिवस

0


दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते.१९८४ साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केला,त्यानंतर *१९८५ पासून दरवर्षी राष्ट्रीय युवा दिवस* म्हणून साजरा केला जाऊ लागला. स्वामी विकेकानंद याचे जीवन आणि त्यांच्या विचारांमधून तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला होता.


  स्वामी विवेकांनंद यांचे नाव अशा विद्वानांमध्ये घेतले जाते,ज्यांनी मानवतेची सेवा हाच खरा धर्म मानला होता. संन्यासी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ मध्ये बंगालमध्ये झाला होता. स्वामी विवेकानंद आपल्या आवेशपूर्ण आणि तर्कावर आधारित भाषणांमुळे लोकप्रिय झाले.विशेष करुन त्यांची भाषणे आणि विचार तरुणांना भावले.



       मानवतेच्या सेवेसाठी विवेकानंदानी १८८७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनचे नाव विवेकानंदानी आपले गुरु रामकृष्ण परमहंस याच्या नावावरुन ठेवले होते. भारतीय तरुणांसाठी स्वामी विवेकांनद यांच्यापेक्षा दुसरा मोठा आदर्श नेता क्वचितच असेल,त्यांनी अमेरिकेतील शिकागोमध्ये १८९३ मध्ये आयोजित विश्व धर्म महासभेत भारत आणि हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते.



     स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय सांगून जातो की,३९ वर्षाचा त्यांचा अल्प जीवनकाळात त्यांनी जे केलं त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना ते मार्गदर्शन करत राहतील.२५ व्या वर्षी त्यांनी भगवे कपडे धारण करत संन्यास घेतला होता.पायी चालून त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं होतं.त्यांनी अनेक देशांनाही भेट दिली होती.


  संत,महंत,विचारवंत, क्रांतिकारक यांनी मानव कल्याण आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणार्पण केले.मानव कल्याणाचा विचार साऱ्या विश्‍वाला देत हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करून देत,मानवी जीवनाला व युवाशक्‍तीला ऊर्जा प्राप्त करून देणारा महान संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद. जे जे सकारात्मक आहे ते सर्व स्वामी विवेकानंदांच्या विचारात आहे, असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात.



११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेचा दिवस उजाडला. यात प्रत्येक धर्माचे धर्मगुरू व चार ते पाच हजार नागरिकही उपस्थित होते. कार्डिनल गिरबन्स हे या धर्म महासभेचे अध्यक्ष होते.प्रत्येक धर्माचे धर्मपंडित आपला धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगत होते. परंतु जेव्हा विवेकानंद उभे राहिले आणि... 'माझ्या अमेरिकेतील बंधू-भगिनींनो' हे वाक्‍य उच्चारताच साऱ्या सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. हिंदू संस्कृतीचे, सभ्यतेचे, सर्वसामावेशकता व सहिष्णुतेचे दर्शन साऱ्या जगाला झाले. त्यांनी हिंदुधर्मावरील परिपूर्ण असे भाष्य केले.त्यांचे चैतन्यपूर्ण व ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. १७ दिवस ही धर्मपरिषद चालली होती.

अमेरिकन बंधू आणि भगिनींनो,तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उंचबळून आलं आहे. जगातली सर्वांत जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारत मातेतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो-करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो,असे म्हणून विवेकानंद म्हणतात.



   आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाहीत तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो. मी त्या देशात राहतो की ज्या देशाने अन्य ठिकाणी रंजल्यागांजलेल्या लोकांना शरण दिली आहे. भारतभूमी ही आश्रय देणारी तर आहे व त्यांना आपलेसे करणारी आहे.विवेकानंद आपल्या भाषणात भगवद्‌गीतेतील श्‍लोक सांगतात, ज्याप्रमाणे नद्यांची उगमस्थाने वेगवेगळी असून त्या वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सागरास मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो. हे पंथ भलेही वेगळे असो पण ते सर्व ईश्‍वरापर्यंत पोहोचवतात हा माझा विश्‍वास आहे.यातून सर्वधर्म समभाव ही शिकवण मिळते.पुढे विवेकानंद सांगतात,सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या वसुंधरेला आपल्या पाशात अडकवून ठेवून धर्माच्या नावावर हिंसा केली.अनेक चांगल्या संस्कृती व देश नाहीसे झाले. कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाविरोधात या सभेने रणशिंग फुंकले आहे. त्यावेळी साम्राज्यवाद अनेक देशांत फोफावला होता. अनेक देश पारतंत्र्यात होते, तर आधुनिकीकरणाची सुरुवातही होत होती. अशा वेळी विवेकानंदांचे भाषण जगाला प्रेरणा व अनेक देशभक्‍तांना ऊर्जा देऊन गेले. विवेकानंदांनी शिकागो परिषदेत आपल्या ओजस्वी वाणीतून जगाला हिंदू संस्कृतीची ओळखच नव्हे तर व्याप्तीही दाखवून दिली. त्यांनी आपल्या भाषणातून एकूण नऊ मुद्दे मांडले. यातून त्यांनी विश्‍वबंधुत्व, स्वातंत्र्य,समता,सहिष्णुतेची महती जगाला सांगितली.



    विवेकानंदांच्या विचाराचा साऱ्या जगावर प्रभाव पडला. सारे जग त्यांना आपले मानू लागले.खऱ्या अर्थाने लोकांनी त्यांना विश्वरत्न मान्य केले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी जग आतुर झाले होते.विचार ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाने नवा संकल्प घेऊन विवेकानंदांचे विचार जगा पुढे मांडले.हेच युवाशक्‍तीची प्रेरणा व ऊर्जास्रोत आहे.तो विचार आजच्या युवा पिढीने अवलंबला पाहिजे,तरच नैराश्‍य जाऊन एक चैतन्य निर्माण होईल.


      धर्म संकल्पनेत त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन होता. तो सऱ्या जगाने स्वीकारला. जगाला दीन,दुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. ईश्‍वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे, असे सांगणारे युगनायक,युगपुरुष,तपस्वी, संन्यासी, निस्सीम देशभक्‍त अखेर कोलकत्ता शहरातील बेलूर मठात ४ जुलै १९०४ रोजी समाधिस्त झाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top